बँकेतून वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार लंपास; अज्ञात तीन महिलांवर गुन्हा


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेसमोरून एका ६४ वर्षीय वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मधुकर पंढरीनाथ पाटील (रा. त्र्यंबक नगर, चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँक ऑफ इंडियाच्या एम.जी. कॉलेज समोर असलेल्या शाखेतून त्यांनी ८० हजार रुपये रोख काढले.

त्यांनी हे पैसे एका प्लास्टिक पिशवीत ठेवून बँकेतील चलन काउंटरवर आर.डी. चलन भरत असताना, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या ३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी महिलांनी संगनमताने त्यांच्या हातातील प्लास्टिक पिशवी अर्धवट कापली. त्यातील ८० हजार रुपयांपैकी ५० हजार रुपयांचे (५०० रुपयांच्या नोटांचे बंडल) चोरून नेले.

या प्रकरणी तीन अज्ञात महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हर्षल पाटील करत आहेत.