यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावातील गायरान शिवारात काही दिवसांपूर्वी दिसलेल्या मादी बिबट आणि तिच्या दोन पिल्लांपैकी एका पिल्लाचा मृतदेह आढळून आला आहे. रविवारी सायंकाळी गायरान भागातील सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतात, केळीच्या क्षेत्रात सुमारे साडेतीन महिने वयोगटातील बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत असल्याची माहिती शेतकरी सचिन दत्तू बावस्कर यांना मिळाली.
या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल प्रादेशिक वनविभागाचे पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वनपाल आय. एस. तडवी यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बिबट्याचे पिल्लू यावल येथे आणले आहे.
या बिबट्याच्या पिल्लावर सोमवारी शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती यावल पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.