अमळनेर-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गोवर्धन-खेडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या अतिवापरामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाडळसरे धरणासाठी खेडी येथून होणारी मुरुमाची वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त वजनाने होत असल्याने, अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ९० लाख रुपये खर्चून नव्याने बांधलेला हा जिल्हा परिषदेचा रस्ता पूर्णपणे खचला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे अत्यंत अवघड झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, नियम पायदळी
गोवर्धन, खेडी, कळमसरे मार्गे पाडळसरे धरणावर मुरुमाची वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत अव्याहतपणे सुरु असते. ग्रामस्थांचा पाडळसरे धरणासाठी मुरूम नेण्याला विरोध नसून, क्षमतेपेक्षा जास्त ‘ओव्हरलोड’ डंपरमधून होणाऱ्या वाहतुकीवर त्यांचा आक्षेप आहे. सुमारे १४ ते १६ टायरचे मोठे डंपर या नव्याने बांधलेल्या रस्त्यावरून धावत असल्याने, दीड महिन्यातच रस्त्याचे ‘तीन-तेरा’ वाजले आहेत. जिल्हा परिषदेच्या निधीतून बनवलेल्या या रस्त्यावर नियमानुसार अवजड वाहनांनी वाहतूक करणे अपेक्षित असताना, त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे.
परिसरातील रस्त्यांचीही वाट लागली
फक्त गोवर्धन-खेडी रस्ताच नव्हे, तर खेडी येथील शेत शिवारातून डंपरने वाहतूक केली जात असताना खेडी-कळमसरे, खेडी-वासरे-कळमसरे आणि खेडी-गोवर्धन-कळमसरे या रस्त्यांवरही अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर मुरूमाची वाहतूक झाली आहे. यामुळे परिसरातील रस्त्यांचा भराव खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळमसरे गावाजवळील पाडळसरे फाट्यावरही अवजड वाहतुकीमुळे मोठे खड्डे पडले असून, ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. गोवर्धन आणि कळमसरे दरम्यानच्या चार किलोमीटर अंतरातील रस्त्याचीही अतिशय दुर्दशा झाली असून, कळमसरे दिशेने येणाऱ्या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे दबली जाऊन चारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
दीड ते दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या या अवजड वाहतुकीवर संबंधित अधिकारी कानाडोळा का करत आहेत, असा प्रश्न ग्रामस्थ आणि वाहनधारक विचारत आहेत. संबंधित ठेकेदाराने क्षमतेपेक्षा जास्त सुरु असलेली वाहतूक तातडीने थांबवावी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.