खळबळजनक : मुख्यमंत्र्यांविरोधात ईडीकडे लेखी तक्रार

 

fadnavis 759 759x422

 

नागपूर (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन नागपूरमधील एका खासगी बँकेला अवैध पद्धतींनी फायदा करुन दिल्याची तक्रार नागपूरमधील महिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपूरे यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) नोंदवली आहे. एवढेच नव्हे तर,सीबीआयने फडणवीस यांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आलीय. जबलपूरे यांच्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.

 

जबलपुरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेमधून अॅक्सिस बॅंकेत वळविला आहे. फडणवीस यांची पत्नी अॅक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे जबलपूरे यांनी म्हटले आहे. मोहनीष जबलपूरे यांनी ७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायलायात मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बॅंकेला मुद्दाम झुकते माप दिल्याचा आरोप जबलपूरे यांनी केला आहे.

 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच हा निर्णय घेताना अॅक्सिस बॅंक आणि राज्य सरकारमध्ये काय करार झाला आणि या निर्णयानंतर जेवढी पैशांची देवाणघेवाण झाली. या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जबलपूरे यांनी आपल्या याचिकेमध्ये केली आहे. २९ ऑगस्ट रोजी या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने दिलेले स्पष्टीकरणात सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Protected Content