साहित्यिक रवींद्र पांढरे यांची ‘अस्तंगत’ कादंबरी प्रकाशित

पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पांढरे यांची नवीन कादंबरी ‘अस्तंगत’ नुकतीच प्रकाशित झाली असून, ती वाचकांच्या आणि साहित्यिक वर्तुळातील चर्चेचा विषय ठरत आहे.

रवींद्र पांढरे यांनी यापूर्वी ‘अवघाची संसार’, ‘पोटमारा’, ‘सायड’, आणि ‘मुडकं कुंपण’ या सामाजिक वास्तवावर आधारित कादंबऱ्या प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या साहित्याला समीक्षक, साहित्यप्रेमी आणि वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, ‘अवघाची संसार’ या कादंबरीवर आधारित ‘घुसमट’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर ‘अवघाची संसार’ व ‘पोटमारा’ या कादंबऱ्यांचा समावेश एम.ए.च्या अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे.

‘अस्तंगत’ ही त्यांच्या साहित्यप्रवासातील एक नवी दिशा दाखवणारी कादंबरी ठरते आहे. यामध्ये त्यांनी गावपातळीवरील राजकारण, तरुणांची राजकारणातील उमेद, त्यातील चढ-उतार आणि शेवटी होणारी वाताहत यांचा वास्तवदर्शी आढावा घेतला आहे. या कादंबरीतून ग्रामीण राजकीय जीवनाचे बारकावे, संघर्ष, आणि सामाजिक गुंतागुंत यांचा नेमका वेध घेतला गेला आहे.

‘अस्तंगत’ ही कादंबरी पुणे येथील श्रीविद्या प्रकाशन यांनी प्रकाशित केली असून, ग्रामीण राजकारणावर अभ्यास करणाऱ्या वाचकांसाठी ती निश्चितच विचारप्रवृत्त करणारी ठरणार आहे. रवींद्र पांढरे यांच्या लेखणीचा ध्यास, ग्रामीण समाजाचे सूक्ष्म चित्रण आणि सशक्त व्यक्तिरेखा या कादंबरीतून पुन्हा एकदा प्रत्ययास येतात. त्यांच्या साहित्यविश्वात ‘अस्तंगत’ ही आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.

Protected Content