बंगाली कारागीरांकडून मोहित ज्वेलर्सची सुमारे १० लाखांची फसवणूक!

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलानी मार्केटमधील मोहित ज्वेलर्स दुकानात ९ लाख ८७ हजार ४१३ रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या ऑर्डरचा परस्पर अपहार करून दोन बंगाली कारागीरांनी धक्कादायक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोघांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम सुंदर अंबालाल सोनी (वय ५८), रा. पटेल नगर, हे आपल्या कुटुंबासह जळगावात वास्तव्यास असून, त्यांचे गोलानी मार्केट येथे मोहित ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सोनी हे अनेक वर्षांपासून बंगालमधून आलेल्या कारागीरांकडून दागिने बनवून घेत असून, विश्वासाने त्यांना अमूल्य सोनं दिलं जातं.

१३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता, त्यांनी बंगालचे रहिवासी संजय शंकर संतारा व मुस्तफा अली या दोन कारागीरांना सुमारे १४३ ग्रॅम वजनाचे, ९ लाख ८७ हजार ४१३ रुपये किमतीचे सोने दिले. यापासून त्यांनी दागिने तयार करण्याची ऑर्डर दिली होती. मात्र, दिलेले सोने घेऊन त्यांनी कोणताही दागिना तयार न करता, ते परस्पर वापरून फसवणूक केली आणि पसार झाले. या प्रकारामुळे सोनी कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

घटनेनंतर श्याम सुंदर सोनी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, दोघांवर विश्वासघात, अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक करत आहे.

Protected Content