जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव येथे जागतिक रेडक्रॉस दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. “मानवतेत एकजूट” या २०२६ च्या संकल्पनेला अनुसरून आयोजित कार्यक्रमांमध्ये रक्तदान, आरोग्य जनजागृती, देणगीदात्यांचा सन्मान तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस जळगावचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी उपस्थितांना जागतिक रेडक्रॉस दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पाचोरा तालुक्यातील आपतग्रस्तांना मदत करणाऱ्या देणगीदात्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रसिद्धीपासून दूर राहून मदत करणाऱ्या दात्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे आणि इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रेडक्रॉसचे कार्य केवळ रक्तपुरवठ्यापुरते मर्यादित नसून दिव्यांग पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक उपक्रमांमध्येही संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे रोहन घुगे यांनी नमूद केले. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सावली केअर सेंटर’ सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय शासनाच्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत ११ ते १६ मे दरम्यान रेडक्रॉस आणि शासन संयुक्तपणे आरोग्य अभियान राबविणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात रेडक्रॉसचे उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी स्वागत करून केली. दीपप्रज्वलन, सर हेन्री ड्युनन्ट यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, रेडक्रॉस ध्वजाला वंदन आणि रेडक्रॉस गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सन २०२५-२६ चा ‘श्रीमती सरला दाते पुरस्कृत सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ योगेश अरुण सपकाळे आणि सुनील सुरमल पावरा यांना प्रदान करण्यात आला.
पाचोरा पुरग्रस्तांना मदत करणाऱ्या देणगीदात्यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. जळगाव पीपल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित भुजबळ, शुभश्री दप्तरी, संत निरंकारीचे राजकुमार वाणी, मनोज लोढा, छगनलाल शिसोदिया, एम. जी. पाटील, प्रशांत छाजेड, सुनील रमेश पाटील तसेच वेगा केमिकल्स आणि बिबा इंटरप्रायजेस यांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघासाठी “आनंदमयी गप्पा गोष्टी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षण आणि आरोग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त माहिती देण्यात आली. डॉ. सृष्टी प्रथमेश जैन यांनी आरोग्यासाठी टाळावयाच्या सवयींबाबत मार्गदर्शन केले.
मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणाऱ्या महिलांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.



