जागतिक दर्जाचे होणार ‘तारापोरवाला ॲक्वेरियम’ पुनर्विकास प्रकल्पाला मंजूरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय तारापोरवाला अ‍ॅक्वेरियम आता नव्या रुपात झळकणार आहे. महाराष्ट्र सरकारने याच्या भव्य पुनर्विकासासाठी २९६ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पर्यटन नकाशावर एक जागतिक दर्जाचे आकर्षण म्हणून उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तारापोरवाला अ‍ॅक्वेरियम हे केवळ एक पर्यटनस्थळ नव्हे, तर मुंबईच्या इतिहासाचा भाग आहे. याच जागी नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅक्वेरियम उभारले जाणार आहे.” थायलंड, सिंगापूर, दुबई आणि युके येथून या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागवले जात आहेत.

कोरोना महामारीपासून हे 72 वर्षे जुने अ‍ॅक्वेरियम 2022 मध्ये बंद करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरचनात्मक तपासणीनंतर ते असुरक्षित घोषित करण्यात आले. समुद्राजवळील जागा आणि कोस्टल रोडच्या कामामुळे झालेल्या कंपनांचा इमारतीवर विपरित परिणाम झाला होता. 4,393 चौरस मीटर जागेवर 20,000 चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. त्यामध्ये 6,500 चौरस मीटरचे भव्य अ‍ॅक्वेरियम, 3.5 दशलक्ष लिटर क्षमतेचा मुख्य टाकी, ग्राउंड आणि मेझनाईन स्तरावर प्रदर्शन विभाग, रूफटॉप कॅफे, मरीन एज्युकेशन झोन आणि 140 वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. याशिवाय, 12 मजली प्रशासकीय व निवासी इमारती उभारल्या जातील. मत्स्य विभागाचे कार्यालय 2023 मध्ये नरिमन पॉईंटला हलवले गेले आहे.

राणे यांनी स्पष्ट केले की, “हे केवळ पर्यटन स्थळ न राहता, शिक्षण व संशोधनाचे केंद्र बनेल. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असेल.” तारापोरवाला अ‍ॅक्वेरियमची स्थापना 28 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली. पारशी उद्योजक डी. बी. तारापोरवाला यांच्या नावावरून या अ‍ॅक्वेरियमचे नामकरण करण्यात आले. 2015 मध्ये अ‍ॅक्वेरियममध्ये महत्त्वाचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी 12 फूट लांब अ‍ॅक्रेलिक टनेल, मुलांसाठी टच पूल आणि विविध परदेशी माशांचे आकर्षक प्रदर्शन साकारण्यात आले होते.

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर, 2023 मध्ये 500 हून अधिक जलजीवांना पुणे, चंद्रपूर आणि अहमदाबादमधील अ‍ॅक्वेरियममध्ये हलवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जलजीवांचे संरक्षण आणि संवर्धन याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. “हा प्रकल्प शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम असेल. आम्ही केवळ संग्रहालय नव्हे, तर एक जागतिक स्तरावरील समुद्री संस्था उभारत आहोत,” असेही नितेश राणे यांनी नमूद केले. नव्या तारापोरवाला अ‍ॅक्वेरियमकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, मुंबईकरांसाठी हे भविष्यातील एक अभिमानाचे प्रतीक ठरेल, यात शंका नाही.

Protected Content