धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा गावामध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील साळवा गावामध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवरायांचा पुतळा बसविण्याबाबत पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान ही घटना बुधवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समोर आली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवरायांची आरती करत सन्मानपूर्वक पुतळा हा ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आला होता. दरम्यान या संदर्भात गावातील ग्रामपंचायत अधिकारी रमेश देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री नऊ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करीत आहे.