विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबात संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कला, वाणिज्य व विज्ञान पदवी अभ्यासक्रमास येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणत्याही शिक्षकाचा वर्कलोड कमी होणार नाही याबाबतची दक्षता अनुदानित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्यावी असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवार ९ मे रोजी नवीन शैक्षणिक धोरणाबात संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील उपस्थित होते. कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, हे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांशी चर्चा करून, त्यांच्या सूचना लक्षात घेवून तयार करण्यात आले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी वर्षभर विद्यापीठाकडून विविध कार्यशाळा घेवून जनजागृती करण्यात आली. आता १२वी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असून पदवी स्तराच्या माहितीपत्रकात चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाची माहिती देणे गरजेचे आहे. प्राचार्यांनी सर्व शिक्षकांशी या धोरणाबाबत चर्चा करावी. कोणत्याही शिक्षकाचा वर्कलोड कमी होणार नाही असेही प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपुर्वी सर्व शंकाचे निराकरण करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.

वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्य व आंतरविद्या शाखा यांची अभ्यासक्रम रचना यावर तीन सत्रांमध्ये अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य प्रिती अग्रवाल आणि प्राचार्य ए.बी. जैन यांनी पदवी स्तरावर हे धोरण राबवितांना आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही.एन. रोकडे यांनी केले. दुपारच्या सत्रात सहअभ्यासक्रमांचे मूल्यांकन व मूल्यमापन यावर चर्चा झाली. त्यानंतरच्या सत्रात या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने खुली चर्चा झाली. यामध्ये उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन कुलगुरू तसेच अधिष्ठाता यांनी केले. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप झाला.

या कार्यशाळेत अभ्यासक्रमाच्या रचनेची पूर्ण माहिती देण्यात आली. पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला क्रेडिट गुणांकन पध्दतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल. म्हणजे प्रत्येक विषयाचे क्रेडिट निश्चित केले जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय असेल त्याला ऑनर्स पदवी म्हटले जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम कायम राहणार आहे. शिक्षण सुरू असतांना बाहेर पडलेल्या विद्यर्थ्यांना काही अटींसह पुन्हा प्रवेश घेता येईल. मात्र त्यासाठी सात वर्षांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक विषयांचे रूपांतर क्रेडिट गुणांकन पध्दतीत केले जाईल. प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पहिल्यावर्षी पदवी प्रमाणपत्र (किमान ४० व कमाल ४४ क्रेडिट गरजेचे). दुसऱ्या वर्षी डिप्लोमा प्रमाणपत्र (किमान ८० व कमाल ८८ क्रेडिट गरजेचे), तिसऱ्या वर्षी पदवी प्रमाणपत्र (किमान १२० व कमाल १३२ क्रेडिट गरजेचे)दिले जाईल. चौथ्या वर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यावर संशोधन किंवा स्पेशलायझेशन पूर्ण झाल्यावर ऑनर्स पदवी दिली जाईल. त्यासाठी किमान १६० व कमाल १७६ क्रेडिट गरजेचे आहे. ऑनर्स स्पेशालायझेशन चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात चौथ्या सत्रात किमान २० क्रेडिटसह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील तसेच संशोधन पदवीसह चार वर्षाच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षात किमान २० क्रेडिटसह संशोधन प्रकल्प, सेमिनार, प्रबंध व इंटर्नशिप असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर असे विभाग असून मायनर मध्ये आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर आपल्या आवडीचा विषय शिकता येईल. चार वर्षाची ऑनर्स पदवी प्राप्त झाल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम केवळ एक वर्षाचा पूर्ण करावा लागेल.

Protected Content