जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव व चोपडा तालुक्यांना जोडणार्या तापी नदीवरील खेडी भोकरी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज पालकमंत्र्यांनी दिली आहे.
चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणार्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातयेणार्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,उद्योगमंत्री उदयजी सामंत, बंदरे व खणी कर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार असून त्यासाठीची पूर्वतयारी सुरु झाल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ना.गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे व निम्न तापी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी आज भोकर येथे नदी परिसरात पाहणी केली.
यासाठी राज्य शासनाने तब्बल १५० कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली असून यामुळे हजारो नागरिकांचा व शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणातील फेरा वाचणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला. यात संबंधीत पूल सार्वजनीक बांधकाम व हा जलसंपदा या दोन्ही खात्यांनी प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलावा असा निर्णय झालेला आहे. गव्हमेंट कंत्राटदार यांना १३ जुलै २०२२ रोजी वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली आहे.
तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल हा उंच पूल असून याची लांबी तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत.सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोहोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल १५० कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.
लक्षावधी लोकांना होणार लाभ
तापी नदी पुलावरील खेडी-भोकर या दोन गावांना जोडणार्या पुलाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबीत होता. परिसरातील हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. वास्तविक पाहता, खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकर्यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. यात चोपडा मार्गे २४ तर अडावद मार्गे २१ किलोमीटरचा फेरा पडत असतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकर्यांना ये- जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. ना. गुलाबराव पाटील , चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने आता ही मागणी प्रत्यक्षात साकारणार आहे. या पुलामुळे परिसरातील हजारो ग्रामस्थ व वाहनधारकांचा मनस्ताप दूर होणार असून त्यांना पडणारा फेरा वाचणार आहे. याचा चोपडा, जळगाव व धरणगाव या तीन तालुक्यातील जनतेला लाभ होणार असून नागरिकांना पुलाच्या कामाची उत्सुकता लागून आहे.
ना.गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली पाहणी
तापी नदीवरील भोकर येथील या ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून त्यासाठीची पूर्वतयारी सुरु झाली असून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आज भोकर येथे नदी परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांनी हेलीपड, व्यासपीठ व पार्किंग व्यवस्था बाबत मार्गदर्शन करून अधिकार्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, निम्न तापी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता वाय.के. भदाणे, कार्यकारी अभियंता एम. एस. चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी येळाई , उप अभियंता गिरीश सूर्यवंशी, डी. सी. पाटील, माजी सभापती भारत बोरसे, जानाअप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, तुरखेडा, नांद्रा , किनोद , भादली येथील सरपंच जितेंद्र पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील ,किशोर पाटील , शिवाजी कोळी यांच्यासह सुभाषअन्ना बडगुजर , युवराज पाटील, सोसायटी चेअरमन श्रीराम सोनावणे, दीपक पाटील, दत्तू सोनावणे, रवींद्र सोनवणे, बाळू अहिरे, अरुण सोनवणे, भागवत पाटील, भीमराव सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोठ्या पुलाच्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद ! : पालकमंत्री
या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, खेडीभोकरी ते भोकरच्या दरम्यानचा पूल हा शेतकरी, प्रवासी आणि एकूणच या रस्त्यावरून ये-जा करणार्या हजारो नागरिकांना व शेतकर्यांना सुविधा प्रदान करणारा ठरणार आहे. यातून आम्ही दिलेल्या एका वचनाची पूर्तता होणार असल्याचा मनस्वी आनंद आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रचंड गतीने कामे सुरूच राहणार आहेत. किंबहुना आधीपेक्षा जास्त वेगाने कामे सुरू झाली असून यात सदर पुलाचे मोठे काम मार्गी लागत असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे.