Home धर्म-समाज सखी दिनानिमित्त पारोळ्यात महिलांची पांडुरंगाच्या पालखीची दिंडी

सखी दिनानिमित्त पारोळ्यात महिलांची पांडुरंगाच्या पालखीची दिंडी

0
1


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशी आणि सखी दिनाचे औचित्य साधत पारोळा येथील लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळाच्या वतीने पांडुरंगाच्या पालखीची भव्य दिंडी काढण्यात आली. रिमझिम पावसात विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तीमय वातावरणात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत पांडुरंगाचे दर्शन घेतले.

आषाढी एकादशी निमित्त श्री संत सखाराम महाराज, अमळनेर यांच्या पंढरपूर दिंडी वारीचे प्रस्थान १ जुलै रोजी अमळनेर येथून झाले होते. ही दिंडी पारोळा येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात मुक्कामी आली. २ जुलै रोजी दुपारी सखाराम महाराज भक्त मंडळाच्या वतीने पूजन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीने आडगाव, तरवाडे आणि तामसवाडीच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला. सखी दिनानिमित्त ३ जुलै रोजी महिला मंडळाच्या वतीने लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयातून पांडुरंगाच्या मूर्तीसह पालखीची दिंडी काढण्यात आली. लवण गल्ली, त्रिमूर्ती चौक, रथ चौक, बालाजी मंदिर, गावहोळी चौक, गुजराथी गल्ली, गणपती चौक आणि मोठा महादेव चौक मार्गे ही दिंडी पांडुरंग मंदिरात पोहोचली. मंदिरात दीपक पिले यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी विठ्ठलभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा शेंडे, उपाध्यक्षा हेमलता चांदवडे, नीता नावरकर, प्रा. वर्षा पुरकर, वृषाली मालपुरे, उषा शेंडे, योगिता येवले, विद्या येवले, वर्षा कोठावदे, शितल टिपरे, रुणल कोतकर, सुचिता नावरकर, चंद्रकला सोनजे, जागृती नावरकर, सुनिता पाटील यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पारोळ्यात सखी दिन आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या दिंडी सोहळ्यामुळे शहरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाने दुमदुमून गेला.


Protected Content

Play sound