Home क्रीडा जळगावमध्ये उद्यापासून २१ जिल्ह्यांच्या महिला फुटबॉलचा महासंग्राम

जळगावमध्ये उद्यापासून २१ जिल्ह्यांच्या महिला फुटबॉलचा महासंग्राम

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला फुटबॉलपटूंच्या कौशल्याचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा), मुंबईच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतरजिल्हा वरिष्ठ महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, २१ ऑगस्टपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल २१ जिल्ह्यांचे संघ आणि सुमारे ५०० महिला खेळाडू सहभागी होणार असून, जळगाव जिल्ह्याचा संघही दमदार तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.

शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटनानंतर सांगली विरुद्ध बुलढाणा यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना रंगणार आहे. तब्बल तीन वर्षांनंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या हिरव्यागार फुटबॉल मैदानावर पुन्हा राज्यस्तरीय सामन्यांचा थरार रंगणार असल्याने जळगावच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेमुळे जळगावमध्ये पुन्हा मोठ्या स्तरावरील फुटबॉलला चालना मिळणार असून, शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी हे नवे पर्व ठरणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत महिला फुटबॉलपटू एकाच मैदानावर आपले कौशल्य पणाला लावणार असल्याने क्रीडाप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपाली काळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यजमान जळगाव जिल्ह्याचा संघही या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आला आहे. संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी जळगाव जिल्ह्याच्या महिला संघाची घोषणा केली. जळगावचा पहिला सामना २२ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्याविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या संघात कर्णधार म्हणून भुसावळच्या लतिका अग्रवाल, तर उपकर्णधार म्हणून जळगावच्या स्वाती गुप्ता यांची निवड झाली आहे. तसेच हिमाली बोरोले, योगिता शिंदे (चाळीसगाव), अर्शिया तडवी, संस्कृती बोरसे, मेहक टकारी (भुसावळ), आर्या वाघ (भुसावळ), ईशा पुनिया, गौरी परचुरे (भुसावळ), शामल भावसार, संपदा कुलकर्णी, देवयानी सोनावणे, नम्रता बाविस्कर, दिव्या मोरे, अक्षदा सालोलकर, दीपाली सुरवाडे, ममता प्रजापत, अमृता चौधरी आणि हिमानी देसाई यांचा संघात समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरबाज खान, तर संघ व्यवस्थापक म्हणून ॲड. निलेश्वरी सूर्यवंशी जबाबदारी सांभाळणार आहेत.

२१ ते २६ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतून अंतिम विजेता संघ निश्चित होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघासाठी तब्बल ३० उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. विफाच्या निवड समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पार पडणार असल्याने सहभागी प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा आपल्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. स्पर्धा विफा आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या नियमांनुसार पार पडणार आहे. सामन्यांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पात्रताप्राप्त १२ पंच सज्ज झाले असून, यामध्ये महिला पंचांचाही समावेश आहे. याशिवाय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी तसेच कोल्हापूरचे मॅच कमिशनर राऊत यांचेही जळगावमध्ये आगमन झाले आहे.

स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार २२ ऑगस्ट रोजी तब्बल आठ सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर २३ ते २५ ऑगस्टदरम्यान दररोज चार सामने होतील. २६ ऑगस्ट रोजी दोन सामने झाल्यानंतर भव्य पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस जळगावच्या क्रीडा संकुलात महिला फुटबॉलचा रोमांच पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील विजेता आणि उपविजेत्यासह प्रथम चार संघांना ट्रॉफी, मेडल्स आणि क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘प्लेअर ऑफ द मॅच’ खेळाडूला प्रमाणपत्र आणि चषक देण्यात येईल. तसेच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेंडर आणि उत्कृष्ट स्कोरर यांनाही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे.

महिला फुटबॉलला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यातील शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी जळगावकरांना मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. जळगावच्या नागरिकांनी, विशेषतः महिला, मुली, शाळकरी विद्यार्थिनी, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उपस्थित राहून महिला फुटबॉलपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन व अतुल जैन, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे आणि सचिव तथा आयोजन समिती प्रमुख फारूक शेख यांनी केले आहे.


Protected Content

Play sound