महिला दिन विशेषः बुलढाणा येथील इंग्रजी शाळेत महिला राज

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महिला केवळ कमकुवत नसून सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अनेक भूमिका पार पाडताना आपण पाहिले आहे. मात्र, बुलढाण्यातील एका इंग्रजी शाळेत शिपाई पासून ते मुख्याध्यापकपर्यंतचा कारभार महिलांकडून खंबीरपणे आणि जबाबदारीने हाताळला जात आहे. महिला दिनानिमित्त पाहूया हा स्पेशल रिपोर्ट…

महिला म्हटलं की चूल आणि मूल असं म्हटलं जायचं, मात्र आता ही संकल्पना महिलांनीच आपल्या कर्तुत्वाने खोडून काढलीये. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्यांच्या पेक्षाही पुढे जाऊन खंबीरपणे दिलेली जबाबदारी चोखपणे बजावताना दिसतायेत. याचे उत्तम उदाहरण बुलडाण्यात पाहायला मिळतंय.

बुलढाणा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने अतिशय कमी शुल्कामध्ये 1972 साली शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश कॉन्व्हेंट ला सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून विद्यार्थ्यांना अविरत विद्यादानाचे कार्य या कॉन्व्हेंट च्या माध्यमातून केले जात आहे. तर गत काही वर्षांपासून या शाळेचे प्राचार्य, शिक्षिका ते शिपाई या सर्व पदांची जबाबदारी ही महिलांवर सोपविण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कार्यरत असलेल्या ह्या संपूर्ण महिला, दिलेली जबाबदारी अतिशय सक्षम पणे बजावत आहेत. या शाळेमध्ये प्राचार्य पासून ते शिपाई पर्यंत एकूण बावीस कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामध्ये सर्वच कर्मचारी ह्या महिला आहेत.

बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा सर्वच बाबतीत वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ आणि ताराबाई शिंदे यांच्या नावाने प्रामुख्याने हा जिल्हा ओळखला जातो. ज्या पद्धतीने माँ साहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडवले, त्यांच्यावर संस्कार केलेत, तसंच सर्व महिला कर्मचारी आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आहे, त्यामुळे सर्वच शासकीय, निमशासकीय सर्वच कार्यालयांमध्ये महिलांची 50 टक्के संख्या पाहायला मिळते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, जी पूर्णपणे महिला सांभाळत आहेत. आणि तेही अतिशय चोखपणे… याच महिलाराज असलेल्या शाळेचा आपण एक भाग असल्याचा अभिमानही येथील महिला शिक्षिकांना वाटतोय आणि त्यांच्यासोबत काम करतांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील आनंद होतोय.

महिलांना पूर्वी दुय्यम दर्जा दिला जायचा, मात्र वेळोवेळी महिलांनी आपल्या सामर्थ्यशाली कर्तुत्वाच्या जोरावर आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि वेळोवेळी स्वतःला सिद्ध करून दाखवत आल्या आहेत. महिलांची सर्व क्षेत्रात प्रगती पाहून, महिला ह्या अबला राहिलेल्या नाहीत हे दाखवून दिलंय. एकंदरीत जर पाहिलं तर, खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाल्याचे हे लक्षण म्हणावं लागेल.

 

 

Protected Content