हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लादून दाखवाच ; शिवसेनेचे भाजपला आव्हान

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. यावर शिवसेनेने हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लादून दाखवाच, असे आव्हान दिले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’ तील ‘रोखठोक’ सदरातून पुन्हा भाजपला पुन्हा डिवचलेय.

 

राज्यात एकीकडे सत्तावाटपावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये आधीच संघर्षाचं चित्र असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून, राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच, असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. याशिवाय, रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत? असा सवालही राऊत यांनी विचारलाय.

 

देवेंद्र फडणवीस यांना पक्षात आज कोणीही विरोधक आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार उरलेला नाही. हा एक विचित्र योगायोग आहे. श्री. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती. श्री. मुंडे यांचे निधन झाले. एकनाथ खडसे यांना आधी डावलले व संपवले. त्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयोजन केले. आता ‘मुक्ताईनगर’ मतदारसंघातून खडसे यांच्या मुलीलाही पराभूत केले. पंकजा मुंडे पराभूत झाल्या. विनोद तावडे यांना घरी बसवले व चंद्रकांत पाटील यांची कोंडी केली. तरीही देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापन करू शकले नाहीत व एक-एक अपक्ष गोळा करीत आहेत, पण या गोळाबेरजेतून 145 जमतील काय?

 

कलियुगच खोटे आहे. स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी राजा हरिश्चंद्राने राज्य सोडले, पित्याने सावत्र आईला दिलेल्या शब्दापोटी श्रीरामाने राज्य सोडून वनवास पत्करला. त्याच हिंदुस्थानात दिलेला शब्द फिरवण्याचे ‘कार्य’ भारतीय जनता पक्षाने पार पाडले आहे. हे सर्व एका मुख्यमंत्रीपदावरून घडत आहे व राज्यात सत्तास्थापना खोळंबली आहे. उद्धव ठाकरे यांनी ३१ तारखेच्या दुपारी स्पष्टपणे सांगितले, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन आलोय असे कुणी समजू नये. त्यांचे हे विधान ज्यांना समजले त्यांनी पुढच्या रामायणाचे भान ठेवायला हवे. मीच पुन्हा मुख्यमंत्री होईन असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले. तरीही रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत, हे रहस्य आहे.

Protected Content