सुशांत आत्महत्या ; तपासाचे वार्तांकन तारतम्याने करा

मुंबई, वृत्तसंस्था । सुशांतसिंह राजपूत आत्महत्या गुन्ह्यात तपासाविषयी वार्तांकन करताना वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगावा व तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं वार्तांकन करावं,’ अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.

काही वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत आठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाळ, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. ‘काही माध्यमांकडून खोट्या, चुकीच्या, निराधार व मुंबई पोलिस दलाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असून त्याला प्रतिबंध करावा’, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सुशांत तपासाच्या वार्तांकनात मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोपही तीन वकिलांनी केला आहे. या दोन्ही याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येणार आहे. सीबीआयला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

Protected Content