ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर; मध्यप्रदेशात राजकीय भूकंपाचे संकेत !

भोपाळ वृत्तसंस्था । मध्यप्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे आता स्पष्ट झाले असून यामुळे राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मध्यप्रदेश निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, श्रेष्ठींनी कमलनाथ यांना प्राधान्य दिले. यानंतर लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर येत्या काही दिवसांमध्येच होणार्‍या राज्यसभा निवडणुकीतही शिंदे यांना तिकिट मिळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे समर्थक मंत्री आणि आमदारांनी भाजपशी संपर्क केला आहे. यात तब्बल 28 आमदारांचा समावेश असून ते राजीनामा देऊन नंतर भाजपकडून निवडणूक लढू शकतात. अर्थात, यामुळे मध्यप्रदेशात सत्तांतर होण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे काही दिवसांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिंदे हे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.

Protected Content