शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी बघणार नाही ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी पाहणार नसून ते याआधीच कोसळेल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ’शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं मी बोललो होतो. यावरती अजूनही मी ठाम आहे. कायद्यानुसार, १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळं हे सरकार सध्या व्हेंटिलेटवर आहे. हे सरकार कधी उलथवायचं हे जनतेला चांगलं ठाऊक आहे.

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणं बसून होतं. सरकार ४० आमदारांच्या पलिकडं नाही. ४० आमदारांची ख्याली खुशाली पाहण्यासाठी सुरू आहे. राज्यात २०२४ ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझं मत पक्कं आहे, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूनं लागणार आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळंच हे सरकार फार काळ टिकाणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो.

Protected Content