जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील नवीन बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना मंगळवारी २० मे रोजी दुपारी चार वाजता घडली. या संदर्भात रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्ना प्रताप कंखरे वय ५२ रा. चहार्डी ता.चोपडाया कामानिमित्त मंगळवारी दुपारी जळगाव शहरात आल्या होत्या. काम आटोपून त्या घरी जाण्यासाठी नवीन बस स्थानकातून बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही हाती लागले नाही. अखेर त्यांनी रात्री आठ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश सोनवणे करत आहेत.