अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका महिलेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दगड आणि दांड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १९ जून रोजी सायंकाळी अमळनेर-डांगर रस्त्यावर घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या तक्रारीवरून गुरुवारी ३ जुलै रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैनाजबी इकबाल शेख (वय ४०, रा. बंगाली फाईल, अमळनेर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सैनाजबी यांच्याकडून अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. पारोळा) याने उसनवारीने काही पैसे घेतले होते. १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सैनाजबी यांनी अनिलकडे आपले पैसे परत मागितले. त्यावेळी अनिलने पैसे देतो असे सांगून सैनाजबी यांना आपल्या दुचाकीवर बसवून अमळनेर ते डांगर रस्त्यावरील एका निर्जन ठिकाणी नेले.
तेथे पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अनिल संदानशिव याने सैनाजबी यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात दगड आणि दांड्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढेच नाही, तर त्याने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैनाजबी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर गुरुवारी, ३ जुलै रोजी रात्री ८ वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल गोविंदा संदानशिव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत.