जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्षुल्लक शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन तरुणांनी एका २६ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जळगावातील इच्छा देवी मंदिर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुरूवार ३ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश सुभाष अंधारे (वय २६, रा. इच्छा देवी मंदिर जवळ, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश अंधारे आणि संशयित आरोपी लखन परदेशी यांच्यात यापूर्वी वाद झाला होता, ज्यात अविनाशने लखनला शिवीगाळ केली होती. याच शिवीगाळीचा राग लखनने मनात धरला होता.
बुधवारी २ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता अविनाश इच्छा देवी चौकात असताना, संशयित आरोपी लखन कमलेश परदेशी आणि त्याचा साथीदार स्वप्निल बापू कापसे (दोघेही रा. इच्छा देवी मंदिराजवळ, जळगाव) यांनी त्याला गाठले. दोघांनी अविनाशला बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत त्याच्या मानेवर, पोटावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाला.
जखमी अविनाश अंधारे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.
या प्रकरणी अविनाश अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लखन परदेशी आणि स्वप्निल कापसे या दोघांविरोधात गुरुवारी ३ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करत आहेत.