Home क्राईम ACBचा जळगाव भूमी अभिलेख कार्यालयाला दणका; लाच स्वीकारताना भूमापक ताब्यात

ACBचा जळगाव भूमी अभिलेख कार्यालयाला दणका; लाच स्वीकारताना भूमापक ताब्यात

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत भूकरमापकाला तब्बल ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, शासकीय कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील ४१ वर्षीय शेतकरी तक्रारदार यांनी राहते गावाच्या शिवारातील गट क्रमांक ६ मधील शेतीच्या गट हिस्सा व पोट हिस्सा पडताळणी तसेच मोजणीसाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अर्ज केला होता. या कामासाठी कार्यालयातील राहुल ताराचंद कोळी (वय ३२), भूकरमापक तसेच कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२), डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, सुरुवातीला भूकरमापक राहुल कोळी यांनी तक्रारदाराच्या भावासमोर ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर पडताळणीदरम्यान मोजणीची नोटीस पाठविण्यासाठी स्टॅम्प शुल्काच्या नावाखाली ६२५ रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. पुढे खासगी मदतनीसासाठी ५०० रुपये आणि नोटीस पाठविण्याच्या खर्चासाठी १,२०० रुपये अशी मागणी करत एकूण ७१ हजार ७०० रुपये देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जुलै २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी जळगाव तालुक्यातील करंज (ता. जळगाव) येथील बसस्टॉप परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान भूकरमापक राहुल कोळी यांनी पंचांसमक्ष ७१ हजार ७०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित) मधील कलम ७ व ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या आरोपीच्या भूमिकेचाही तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी कारवाईवर देखरेख ठेवली. तसेच पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनिरी सुरेश पाटील, पोहवा संगीता पवार, पोकॉ प्रदीप पोळ, भूषण पाटील, मनोज पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पडली.


Protected Content

Play sound