बनावट नोटा प्रकरणी महिलेला अटक; जिल्हा पोलीसांच्या तपासात उघड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथून कोकिळा रघुनाथ मंगरुळे (वय ४०) या महिलेला अटक केली आहे. अटकेतील संशयितांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत तब्बल २४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा वापरल्याचे समोर आले आहे. यामुळे, पोलिसांनी ज्या भागात या नोटा चालविल्या गेल्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणाचा छडा २७ जून रोजी लागला, जेव्हा स्थानिक गुन्हे शाखेने सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४) आणि सचिन संजय गोसावी (वय २३) या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार रुपये किमतीच्या १२ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. चौकशीदरम्यान, या दोघांनी यापूर्वीच २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्याची माहिती समोर आली होती, ज्यामुळे पोलीस आता या नोटांचाही शोध घेत आहेत.

या प्रकरणात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी विजय प्रभुलाल माहोरे (वय ३८) यालाही अटक केली. माहोरेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथील कोकिळा मंगरुळे या महिलेकडून घेतल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोकिळा मंगरुळेला अटक केली आहे. या बनावट नोटांच्या रॅकेटचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत. या अटकेमुळे बनावट नोटांच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.