यावलमध्ये केळी व्यापाऱ्यावर लांडग्याचा हल्ला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या चर्चांना ऊत आले असतानाच, आता यावल शहरालगतच्या टेंभी शिवारात एका केळी व्यापाऱ्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यापारी जखमी झाले असले तरी सुदैवाने ते मोठ्या अनर्थातून बचावले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, इरफान रशीद खान (वय ५२, रा. बाबानगर, यावल) हे केळी व्यापारासंदर्भात आकाश बाळू पाटील यांच्या टेंभी कुरण शिवारातील शेतात दुपारी साधारण १२.३० वाजता मोटरसायकलने जात होते. यावेळी अचानक शेताच्या दिशेने आलेल्या लांडग्याने त्यांच्यावर झडप घालत मोटरसायकलवर हल्ला केला. लांडग्याने थेट त्यांच्या छातीवर पंजा मारून जखमी केले. मात्र, प्रसंगावधान राखत इरफान खान बचावले. या घटनेनंतर लांडगा घटनास्थळावरून पसार झाला.

जखमी इरफान खान यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, “देवाच्या कृपेने मी बचावलो, पण हा प्रकार भीतीदायक आहे.” या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या भागात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Protected Content