रिक्षाचालकाला अडकवण्याचा कट उघड, दोघांना अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील नेरी नाका येथे २८ मार्च रोजी एका रिक्षाचालकाच्या रिक्षातून देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून धक्कादायक खुलासा केला आहे. रिक्षाचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नेरी नाका येथे रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू ६१०८) ची तपासणी केली असता, त्यामध्ये देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी रिक्षाचालक राहुल रंगराव पाटील (रा. कुसुंबा ता.जळगाव ) याला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान, पोलिसांनी राहुल पाटील आणि नितीन वसंत तायडे (वय २५, रा. कुसुंबा) यांच्यातील वादाची माहिती मिळाली. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून नितीन तायडेने राहुल पाटील यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. नितीन तायडेने त्याचा मित्र ऋषिकेश उर्फ बंटी बापू चित्ते (वय २०, रा. कुसुंबा) याच्या मदतीने हा कट रचला. नितीनने ऋषिकेशला पिस्तूल आणि काडतूस दिले आणि ते राहुल पाटील यांच्या रिक्षात लपवण्यास सांगितले. ऋषिकेशने २८ मार्च रोजी रात्री २ वाजता राहुल पाटील यांच्या घराजवळ जाऊन पिस्तूल रिक्षात ठेवले. त्यानंतर ऋषिकेशने एका हॉटेल चालकाला राहुल पाटील यांच्या रिक्षात पिस्तूल असल्याची माहिती दिली. हॉटेल चालकाचा मित्र पोलीस असल्याने त्याने पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी राहुल पाटील यांच्यावर कारवाई केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून नितीन तायडे आणि ऋषिकेश चित्ते यांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध खोटा पुरावा तयार करून राहुल पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, राहुल पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Protected Content