जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेची महासभा बुधवारी, १५ एप्रिल रोजी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत शहरातील पाणीपुरवठा, भटक्या श्वानांचा सुळसुळाट आणि बंद पडलेले पथदिवे या मुद्द्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः शहरातील पाणीपुरवठा अनियमित आणि पिवळसर होत असल्याच्या तक्रारींनी सभागृह गाजले.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. शहरात रात्री-अपरात्री आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना मंगला चौधरी, उज्वला बेंडाळे, निलेश तायडे आणि सुरेखा तायडे यांनी व्यक्त केली. याच दरम्यान नगरसेवक जाकीर पठाण यांनी नवीन नळ संयोजनाबाबत प्रशासकीय उदासीनतेवर बोट ठेवले. नवीन नळ कनेक्शनसाठी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, ‘सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे’ असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आरोग्य विभागाच्या कामकाजावरही सभेत कडक ताशेरे ओढण्यात आले. नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे यांनी श्वान निर्बीजीकरण मोहिमेच्या अपयशाबद्दल सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांना धारेवर धरले. संबंधित एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शहरात श्वानदंश झालेल्या नागरिकांना महापालिकेकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच पावसाळा जवळ येत असल्याने शहरातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न मांडताना अनेक भागांतील एल इ डी पथदिवे बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यामुळे रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर उपाय म्हणून शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र अशा कर्मचाऱ्यांना कंत्राटीऐवजी मानधन तत्त्वावर घेण्यात यावे, अशी सुधारित सूचना सदस्यांनी केली. महासभेतील या चर्चांनंतर आता प्रशासन या समस्यांवर नेमकी काय कृती करते, याकडे जळगावकर जनतेचे लक्ष लागले आहे.



