Home Cities जळगाव शरद पवार गटात बदलाचे वारे : जिल्हाध्यक्षांसह महानगराध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव

शरद पवार गटात बदलाचे वारे : जिल्हाध्यक्षांसह महानगराध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव

0
124

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले असून जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा बैठकीतच राजीनामा घेण्याचा ठराव संमत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा दारूण पराभव झाला. यातच पक्षातील अंतर्गत कलह अनेकदा अधोरेखीत झाला असतांनाच आता जिल्हा बैठकीत दोन्ही जिल्हाध्यक्षांचा राजीनामा घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा बैठक झाली. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नेते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जामनेरचे डॉ. मनोहर पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. तर डॉ. सतीश पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतांना आगामी काळातील निवडणुक लक्षात घेता जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा निरिक्षक प्रसन्नजीत पाटील यांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान, डॉ. सतीश पाटील यांनी एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमावेत अशी सूचना देखील याप्रसंगी केली. तर रवींद्रभैय्या पाटील यांनी राजीनामा वरिष्ठांना पाठवून दिल्याचे नमूद केले. तर आता जिल्हाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound