जळगाव, प्रतिनिधी | मी मुक्ताईनगर मतदार संघातून यावेळी उमेदवारी करणार नाही, माझे याबाबत पवार साहेबांशी बोलणे झाले आहे. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांनी आज (दि.५) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत जाहीर केली.
जे पाच इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवारी निश्चीत करावी, मी मतदार संघात त्याच्या मागे माझी सगळी ताकद उभी करेन, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान त्यांच्यानंतर बोलायला उभे राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांनी मात्र सगळ्या इच्छुक पाच उमेदवारांचा विषय संपला असून केवळ रवींद्रभैय्याच उमेदवारी करतील, असा आग्रह धरल्याने पुन्हा मुक्ताईनगरमधून नेमके कोण लढणार हा विषय अधांतरीच राहिला आहे.
ब्याद गेली – यु.डी. पाटील
यावेळी बोलताना यु.डी. पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर विशेषत: पद्मसिंह पाटलांवर जोरदार टीका केली. ते थकलेले नेते होते, पवार यांच्याशी नाते असल्याने त्यांना हाकलताही येत नव्हते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षाचे काहीही नुकसान झाले नसून उलट ब्याद गेली आहे, अशा शब्दात त्यांनी निर्भत्सना केली.