दापोरा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर पोलीसांची धाड; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारात गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी धडक कारवाई करत हातभट्टी उध्दवस्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील शेतात बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार ११ मार्च रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दापोरा शिवारात सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टीवर धाडी टाकल्या.

याठिकाणी कच्चे व पक्के रसायन असे एकुण १ लाख २६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाला आढळून आला. यातील दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन पोलीसांनी नष्ट केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अरूण सोनवणे आणि जीभाऊ वसंत गायकवाड दोन्ही रा.दापोरा ता.जि.जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, नाना मोरे, संजय भालेराव, अभिषेक पाटील, उमेश ठाकूर यांनी केली आहे.

Protected Content