चांगल्या विचारांतून घडते मनुष्याचे जीवन – प्राचार्य डॉ . अनिल झोपे

पहूर ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.

“आपले विचार हेच आपल्या यशाचे शिल्पकार असतात, विचारांचा प्रभाव आपल्या मनावर पडत असल्याने त्यातूनच मनुष्याचे जीवन घडत असते. त्यामुळे शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून विचारांना योग्य दिशा द्या.” असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित दहावीच्या शुभेच्छा समारंभाप्रसंगी ते बोलत होते .

प्रारंभी प्राचार्य डॉ.झोपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरस्वती देवी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी भूषविले.

याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.सी.डी.साळुंखे यांनी “विद्यार्थ्यांनी अपार मेहनत करून आपल्या जीवनात आदर्श निर्माण करावा.” असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका व्ही.व्ही.घोंगडे यांनी केले. .

यावेळी उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या मार्गदर्शनातून रूपाली सोनवणे या विद्यार्थिनीने साकारलेल्या ‘काव्यधारा’ या हस्तलिखित काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, अॅड.एस.आर.पाटील, केंद्र संचालक आर.बी.पाटील, वर्ग शिक्षक हरीभाऊ राऊत यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. अमृता सोनवणे आणि भरत चव्हाण या विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी संस्थेतर्फे मान्यवरांचे स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रियंका चव्हाण यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. भारत स्काऊट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल शिक्षक चंदेश सागर यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी संचालक रामचंद्र वानखेडे, ज्ञानेश्वर लहासे, युसूफ बाबा, आर.बी.आर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, मिल्लत उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक झेड.एम.पटेल, डॉ.हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख, गणेश राऊत, कीर्ती घोंगडे, सुषमा चव्हाण, पत्रकार गणेश पांढरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी केले. बी.एन.जाधव यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content