देहविक्री करण्यास भाग पाडून पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । चोपडा येथे एका महिलेस बळजबरीने देहविक्रीस भाग पाडून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी पुण्यातून एका पीडितेला आणून चोपड्यातील वेश्या व्यवसायात अडकवण्यात आले होते. मात्र कुंटणखाना मालकिणीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळल्याने गावातीलच रवींद्र छबू सोनवणे (पाणीवाला) याने तेथून पीडितेची सुटका करण्यास मदत केली. यानंतर दोघांनी नव्याने संसारही थाटला. मात्र, काही दिवसांतच पीडितेचा छळ पुन्हा सुरू झाला. रवींद्रने पूजाच्या अंगावरील दागिने गोड बोलून घेऊन घेत त्याच वेश्यावस्तीत जागा घेऊन तिला नव्याने व्यवसाय करण्यास भाग पाडले. पीडितेने देहविक्रय व्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२० रोजी तिला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तिला आठ ते दहा गुंडांनी घरातून ओढून बेदम मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळ काढला होता.

याबाबत चोपडा शहर पोलिसांनी साधी तक्रारीही दाखल करून घेतली नाही. परिणामी पीडितेने थेट नाशिक पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन आपल्यासोबत घडलेल्या घटनेची आपबिती सांगितली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रवींद्र छबू सोनवणे, जितेंद्र ड्रायव्हर, बबलू, बंटी वाघ, किरण मराठे, रवींद्र मराठे, मंगलाबाई मराठे, संजू भालेराव, भोला कोळी यांच्या विरुद्ध अत्याचार, प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content