मोठी बातमी : संजय शिरसाठ शिवसेनेत परतीच्या मार्गावर ?

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असतांना संजय शिरसाठ यांनी केलेले ट्विट राजकारण्यात चर्चेचा विषय बनले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यात औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाठ यांनी तर भर मिटींगमध्ये यावरून शिंदे यांच्याशी वाद घातल्याचे वृत्त देखील प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. संजय शिरसाठ, आशिष जैसवाल, प्रताप सरनाईक, चिमणराव पाटील आदींना अपेक्षा असतांनाही मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ही सर्व मंडळी नाराज असल्याचे अधोरेखीत झाले होते.

या पार्श्‍वभूमिवर, औरंगाबाद शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी एक ट्विट करून ते काही मिनिटांनी डिलीट केले. मात्र तोवर या ट्विटने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली. या ट्विटमध्ये त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ जोडलेला होता. तसेच यावर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब असा उल्लेख केला होता. त्यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले. मात्र या माध्यमातून ते शिवसेनेत परतीच्या मार्गावर तर नव्हे ना ? ही चर्चा सुरू झाली आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी याबाबत आपली भूमिका टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना मांडली आहे. यात ते म्हणाले की, उध्दव ठाकरे हे आमच्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणूनच होते. त्यांच्याबाबत आमच्या मनात आजही सन्मान आहे. मात्र त्यांनी आमचे ऐकले नसल्याने त्यांची आजची अवस्था झाली असून आम्हाला याचे वाईट वाटते असे ते म्हणाले. तर मंत्रीपद मिळाले म्हणून आपण हे ट्विट केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content