मुंबई (प्रतिनिधी) साधारण ३ दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना फोन करून ‘तुम्ही मुंबईत कधी येणार?’ अशी विचारणा केली होती. ‘तूर्त नाही’ असे बागडेंनी उत्तर दिल्यामुळे दादांनी फोन करण्याचे कारण सांगितले नव्हते. त्यामुळे हरिभाऊ बागडे जर तेव्हाच मुंबईत असते, तर अजितदादांनी त्याच दिवशी राजीनामा दिला असता अशी चर्चा आहे.
अजितदादांच्या राजीनाम्यानंतर बागडे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, सायंकाळी अजित पवार यांचे पीए माझ्या मुंबईतील कार्यालयात गेले. माझ्या पीएसची भेट घेतल्यानंतर फाेनवर मला सांगितले की, अजितदादा राजीनामा देऊ इच्छित आहेत, असे सांगून बागडेंचे थेट दादांशी फाेनवर बाेलणे करून दिले. दादांनी राजीनाम्याचा निर्णय सांगितला. त्यावर मी चकित झालो. एवढा तडकाफडकी निर्णय का? असे विचारले असता ‘नंतर बोलू’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. निवडणूक लढवणार नाही का? असा प्रश्नही केला असता त्यांनी ‘नंतरच बोलू’ असे सांगितले. याआधी ३ दिवसांपूर्वीही दादांनी मला फोन करून मुंबईत कधी येणार आहात?’ असे विचारले होते, मात्र तूर्त मी येणार नसल्याचे त्यांना सांगितले होते. दरम्यान, यावरूनच हरिभाऊ बागडे मुंबईत राहिले असते तर दादांनी तीन दिवसांंपूर्वीच आपला राजीनामा दिला असता, असा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.