राजतिलक की करो तयारी…अडीच वर्षांनी फुलले गिरीशभाऊ समर्थकांचे चेहरे !

जामनेर, भानुदास चव्हाण ( Special Report) | राज्यात देवेंद्र सरकार सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट होताच येथील आ. गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सत्ता नसल्याची बैचैनी अनुभवल्यानंतर आता गिरीशभाऊ पुन्हा मंत्री बनणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

गेल्या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून आ. गिरीश महाजन म्हणून ख्याती अर्जीत केली. मंत्रीपदासह पक्षाने सोपविलेल्या सर्व जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश संपादन करून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. यामुळे साहजीकच त्यांना २०१९ च्या निकालानंतर पुन्हा मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. तथापि, महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने भाजपला सत्तेपासून वंचीत रहावे लागले. अर्थात, आमदार गिरीशभाऊंना देखील मंत्रीपदाने हुलकावणी दिली.

गेल्या अडीच वर्षांचा विचार केला असता, आमदार गिरीश महाजन यांना स्थानिक पातळीवरील राजकारणात अनेक अडचणी आल्या. त्यांना बीएचआर प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. मविप्र प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांनी आपल्यावर मोक्का लावण्याच्या हालचाली करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. यानंतर व्हिडीओबॉंब प्रकरणात याच्याशीच संबंधीत पुराव्यांच्या चित्रफिती त्यांनी सादर केल्या होत्या.

स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सहकार या दोन्ही आघाड्यांवर देखील त्यांना अपयश आले होते. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेत भाजपच्या सदस्यांमध्ये उभी फूट पडून शिवसेनेने सत्ता संपादन केली. हा आमदार महाजन यांना मोठा धक्का होता. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या चर्चेत त्यांना गुंतवून ठेवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ता संपादन केली होती. यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यांनी निवडणुकीतून पळ काढल्याचे आरोप करण्यात येत होते.

दरम्यानच्या काळात गेल्या पंचवार्षीकमध्ये जामनेरात झालेल्या कामांची गती देखील मंदावली होती. सत्ता नसल्याने समर्थकांमध्येही बर्‍याच प्रमाणात मरगळ आल्याचे दिसून येत होते. तथापि, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचेही स्पष्ट झाले होते. अर्थात, सत्ता नसल्याची सल सर्वांनाच होती. आता २१ जूनपासून शिवसेनेत बंडाची चाहूल लागल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली. तर कालच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा गट मिळून सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आमदार गिरीशभाऊ महाजन यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचेही निश्‍चित आहे. त्यांचे खाते अद्यापही समोर आले नसले तरी त्यांना चांगला पोर्टफोलिओ मिळण्याची शक्यता आहे.

आमदार गिरीशभाऊ महाजन यांना मंत्रीपद मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने यातील निवडक पदाधिकार्‍यांशी संवाद साधला असता त्यांनी आपण शपथविधीनंतरच आपल्या भावना व्यक्त करू अशी माहिती दिली. तर भाऊंच्या शपथविधीला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समर्थक जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Protected Content