ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही – उद्धव ठाकरे

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. या समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही. या समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी व पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आ. प्रकाश शेंडगे, ओबीसी समाजाचे, १२ बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content