मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांनी तीनदा शिवसेना फोडून देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याला आमचा विरोध होता यातूनच आम्ही स्वतंत्र मार्ग निवडला असल्याचा दावा फुटीर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. तर संजय राऊत यांच्या सारख्यांच्या विखारी टिकेला उत्तर मिळणारच असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे समर्थक तसेच प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज एबीपी-माझा या वाहिनीशी आज विशेष वार्तालाप केला. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत ज्या भाषेत बोलतात त्यांना उत्तर मिळणार नसल्याचे कुणी समजत असेल तर ते खरे नाही. आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आणि त्यांना उत्तर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे फोन उचलले जात नव्हते असा आरोप त्यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस हे रात्री बारा वाजता देखील फोन घेत असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
केसरकर यांनी याप्रसंगी शरद पवार यांच्यावर देखील टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, पवार यांनीच तीनदा शिवसेना फोडली. त्यांनी दगाबाजी केली असतांनाही मविआच्या माध्यमातून सत्ता स्थापन केल्यानंती अडीच वर्षात आम्हाला राष्ट्रवादीची दादागिरी सहन करावी लागली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. याच पक्षाचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हे शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात वक्तव्ये करत असतांना आम्ही कुठवर सहन करावे असा प्रश्न देखील त्यांनी केला.