राज्य सरकारला निवडणुका का नकोत ? : राज ठाकरे यांचा प्रश्‍न

पुणे प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणाच्या आडून निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. तर, पराभवाच्या भितीमुळे सरकारला निवडणुका नको असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

आज सकाळी पुणे येथे राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ठाकरे म्हणालेत की, ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नसल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, राज्य सरकारलाच निवणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण देऊन निवडणुका लांबणीवर टाकायच्या. त्यानंतर महापालिकांवर राज्य सरकारकडून प्रशासक नेमून आपल्याच हातात महापालिका प्रशासन ठेवण्याचा सरकारचा इरादा आहे. खरंतर राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे. ठरवलं तर ओबीसी जनगणना केली जाऊ शकते, असं राज ठाकरे म्हणाले. मात्र निवडणुकांमध्ये विजयाची शाश्‍वती नसल्याने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप राज यांनी केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!