कोणते भाजप नेते आहेत महाविकास आघाडीच्या रडारवर ?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीही प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाली असून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्यांना रडारवर घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा केली जात आहे.

यासंदर्भात राज्यातील गृहखातं हे भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यामध्ये कमी पडत असल्याची तक्रार शिवसेनेकडून केली जात असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी व्यक्त केली त्यांनतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर संपन्न झाली. या बैठकीत भाजप नेत्यांना रडारवर घेण्याची चर्चा झाल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या रडारवर असलेले नेते कोण ? हे अद्याप अस्पष्ट असून याविषयी तर्क वितर्क लढविले जात आहे.

मोहित कंबोज, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात काही पुरावे असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याचे सांगत राष्ट्रवादी हे भाजपविरोधात नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मुख्ममंत्री उद्धव ठाकरेदेखील राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा असून या संदर्भात  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊत उपस्थितीत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आक्रमक असून त्यांनी राष्ट्रवादीवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचं चित्र दिसून येत आहे.

Protected Content