नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकार नागरिकत्व सुधारण विधेयक आणत आहे. मात्र, याच सरकारने अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात वसवण्यासाठी काय केले?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आहे.
या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले की, नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर स्थलांतरितांची कोणत्या राज्यात व्यवस्था करण्यात येणार आहे? एवढेच नव्हे तर व्होटबँक तयार करण्याचा आरोप फोल ठरवण्यासाठी स्थलांतरितांना पुढील २५ वर्षे मतदानाचा हक्क देऊ नये, असे राऊत यांनी म्हटले. तसेच आमचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध नाही. घुसखोरांना बाहेरच हाकलून दिले पाहिजे. स्थलांतरित हिंदुंना नागरिकत्व देणे, हेदेखील अगदी योग्य आहे. मात्र, त्यामुळे भाजप व्होटबँक तयार करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. परिणामी केंद्र सरकारने या विधेयकामागील उद्देश स्पष्ट करावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.