जळगाव प्रतिनिधी । जळगावात महायुतीचे सर्वच उमेदवार मतमोजणीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. विजयाच्या दिशेने महायुतीच्या उमेदवारांची घोडदौड चालली आहे. बंडखोरांमुळे उमेदवारांचे मताधिक्य कमी होईल, परंतु आम्ही निश्चित 220 चा आकडा पार करु, अशी स्थिती राज्यात दिसत आहे, असा विश्वास भाजपचे ‘संकटमोचक’ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा काहीच परिणाम या निवडणुकीत दिसून येत नाही. उमेदवारांचे मताधिक्य कमी होईल, परंतु उमेदवार महायुतीचाच निवडून येईल. ज्याप्रमाणे भाजपचे बंडखोर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचेही बंडखोर होते. परंतु निवडून मात्र आमचा महायुतीचा उमेदवार येईल. तसेच बंडखोरांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. काहींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर काहींची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, जो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे तोच आमचा अधिकृत उमेदवार आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.