बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये ऋणनिर्देश दिन साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बी.यू.एन. रायसोनी स्कूल सी.बी.एस.ई पॅटर्न, प्रेमनगर येथे संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब उत्तमचंद रायसोनी यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक १४ रोजी कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि भाऊसाहेब उत्तमचंद रायसोनी यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी आई-वडील आणि वडीलधाऱ्यांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून, त्यांचे ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने शाळेच्या प्रशासनाकडून हा विशेष दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना वृद्धिंगत होईल आणि त्यांच्या संस्कारक्षम जडणघडणीस हातभार लागेल, असे शाळेच्या प्रशासनाने सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकवृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. संपूर्ण शाळेत या भावनिक आणि सन्माननीय क्षणाने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.