जळगाव महापालिकेच्या सर्वंकष विचारासाठी मंत्रालयात बैठक घेवू- मंत्री ना. एकनाथ शिंदे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराचे प्रश्न, धोरणात्मक मुद्दे आणि महापालिकेची परिस्थिती असा सगळा सर्वंकष विचार करून मुद्देसूद निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधानसचिवांसह सर्व संबंधितांचे बैठक घेवू असे आश्वासन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेतील आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत प्रास्ताविक करतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, या महापालिकेला शक्य तेवढ्या लवकर राज्य सरकारकडून १५१ कोटी रूपये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मेहरूण तलाव, उद्यान दुरूस्ती व सुशोभिकरणासाठी ५१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हुडकोच्या कर्जातून राज्य सरकारने या शहराला दिलास देणे अपेक्षित आहे. तितकाच मोठा प्रश्न इथे गाळेधारकांचाही आहे. आधिच्या सत्ताधाऱ्यांकडून या सर्व मुद्द्यांवर त्यांनी दिलेली आश्वासने पुर्ण होवू शकले नाही. दुसरीकडे महापालिका आणि जिल्ह्‌यातील नगरपरिषदांमध्ये रिक्त पदांचा मुद्दाही महत्वाचा आहे. हा जिल्हा सर्वात जास्त नगरपरिषदा असलेला जिल्हा आहे. जामनेर व चाळीसगाव नगरपरिषदेला अजूनही पुर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाला नाही. नशिराबाद नगरपरिषद झाल्याबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभारी आहोत. मुक्ताईनगर वरणगाव पारोळा, नशिराबाद या शहरांसाठी नगरपरिषदांच्या मुख्यालयाच्या इमारती बांधण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रूपये राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावे अशी अशा आहे. शिवसेनेसाठी मोठे बलिदान दिलेला हा जिल्हा आहे. हे मी आवर्जून सांगतो. सध्या ओढून ताणून आम्ही महापालिका ताब्यात घेतली तरी कामांच्या बळावर पुढे आम्हाला ही महापालिका स्वबळावर ताब्यात घेता येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला साथ दिली पाहिजे. सध्या ६१ कोटी रूपयांमध्ये शहरात छोटीमोठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. असेही ते म्हणाले. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या प्रास्तविकानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, खरं तर या आढावा बैठकीला भरपूर वेळ देता आला पाहिजे होता मात्र नाईलाज झाला. आपल्यावर आता जबाबदारी वाढली आहे. याचे भान ठेवून सगळ्यांनाच काम करावे लागेल. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या शहरात प्रथम रस्ते सुस्थितीत आणावे लागतील. प्रधान सचिवांसह सर्वांची तात्काळ बैठक घेवून रस्त्यांसाठी तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येईल. अन्य प्रश्न व अडचणी दूर करू त्यासोबतच या महापालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रयत्न करावे लागतील. हे सगळ करतांना नगरविकास खात्यासह अन्य मार्गांमधूनही निधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. महापालिकेचे उत्पन्न वाढविणे व उत्पन्नाचे नवे मार्ग तयार करणे यावर भर दिला जाईल. मधल्या काळात कोरोनामुळे बरीच बंधन आली. तरीही ही महापालिका शक्य तेवढी स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे. राज्यात शहरांमध्ये सामन्यांना परवडणाऱ्या घरांसाठी एफएसआय वाढवला. गृहबांधणीचे बरेच नियम लोकांच्या सोईचे केले आहेत तथापी जळगाव शहरासाठी तात्काळ सुटणारे प्रश्न नक्कीच तात्काळ सोडवू आणि धोरणात्मक मुद्द्यांवर तपशीलाने विचार करून मार्ग काढू असेही ते म्हणाले. 

Protected Content