मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राने कुणाच्या पाठीत वार केले नाहीत, तर अफजलखानाचा कोथळाही बाहेरून काढल्याची आठवण करून देत आज शिवसेनेने भाजपला आपण कोणत्याही संघर्षासाठी तयार असल्याचा इशारा सामनातून दिला आहे.
शिवसेनेचा मुखपत्र असणार्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. विधानसभा सहा महिन्यांसाठी संस्थगित करून राज्यपालांनी प्रशासकीय सूत्रे राजभवनाकडे घेतली आहेत. आता सल्लागारांच्या मदतीने ते इतक्या मोठया राज्याचा कारभार हाकतील. राज्यपाल हे अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक होते. उत्तराखंड या पहाडी राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पण महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. आकाराने आणि इतिहासाने ते भव्य आहे. येथे वेडेवाकडे काही चालणार नाही. इतक्या मोठया राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपण ४८ तासही देणार नसाल तर दया, कुछ तो गडबड है असे जनतेला वाटू शकते.
यात पुढे नमूद केले आहे की, राज्यपाल येतील आणि जातील, पण महाराष्ट्र तेथेच राहणार आहे. आज महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या भूमिकांचे पक्ष आपापले पत्ते हाती घेऊन पिसत आहेत. या खेळात दुर्री, तिर्रीसही महत्त्व आले आहे. राजभवनाच्या हाती एक्का नसतानाही त्यांनी तो फेकला. जुगारात असे बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची चीज नाही. सरकारे येतील, सरकारे जातील; पण अन्याय आणि ढोंगाशी लढण्याची महाराष्ट्राची प्रेरणा अजिंक्य आहे. महाराष्ट्राने कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखार्यावरून चालणारे आम्ही आहोत. हा निखारा म्हणजे विझलेला कोळसा नाही. निखार्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल. आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत असा सूचक इशारा यात देण्यात आला आहे.