अडावद येथे २८ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी !

जळगाव प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील अडावद येथे तब्बल २८ कोटी ५५ लाख रूपयांची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली असून  राज्य शासनाने आज त्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. 

याबाबत माहीती की, सद्यस्थितीत अडावद गावात 22 विंधन विहिरी वरून जमतेम दरडोई 30 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा होत होता. सदर गावा करिता पूर्वीची पाणीपुरवठा योजना सन 1985 पासूनची असल्याने योजना कालबाह्य झालेली होती. तालुक्यातील अडावद हे सर्वात मोठे गाव असून येथील अस्तित्वातील  पाणी पुरवठा योजना नागरिकांसाठी अपूर्ण पडत  होती . यामुळे येथे पाण्याची नेहमीच तीव्र टंचाई भासत असे. कायमस्वरूपी येथे नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांनी 28 कोटींच्या या योजनेला मान्यता दिली असून याबाबतचे परिपत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. 

जल मिशन योजनेअंतर्गत अडावद येथील पाणी पुरवठा योजनेसाठी २८ कोटी ५५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अंतर्गत पूर्ण केली जाणार आहे. याच्या अंतर्गत तापी नदीवर निम्न तापी प्रकल्पाच्या खालील बाजूस असणार्‍या वडगाव बुद्रुक येथील पाणी साठ्यातून उचल करून ती गावातील ३.९० दशलक्ष लीटर्स इतकी क्षमता असणार्‍या जलकुंभातून संपूर्ण गावात वितरण करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषानुसार दरडोई ५५ लीटर इतके पाणी यातून पुरविले जाणार आहे.

अडावद येथे होणार जलशुद्धीकरण केंद्र

या योजनेतून अडावदकरांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी अडावद येथे 6.30 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होणार आहे.  सदर योजनेत जोड नलिका , परिक्षण विहीर,  जॅकवेल,  पंपिंग मशिनरी , जलकुंभ , वितरण व्यवस्था व अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे. सदर योजना कंत्राटदाराने पूर्ण करून एक वर्ष चालवावी लागणार आहे. यानंतर ही योजना अडावद ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

Protected Content