दूषित सांडपाणी सोडणारा कारखाना बंद करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

ajanda meeting

रावेर, प्रतिनिधी | येथील ओंकार इंडस्ट्रीजमधून निघणारे दूषित सांडपाणी नाल्यात सोडल्याने चार गावांच्या पाणी पुरवठ्याच्या कुपनलिकांसह परीसरातील सुमारे ३५ ते ४० कुपनलिकांचे पाणी दुषित असून ही इंडस्ट्रीज येथून तत्काळ बंद करावी यासाठी संबधित विभागाला शेतकऱ्यांनी २० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आज (दि.५) आमदार शिरीष चौधरी यांनी एका बैठकीत दिला.

 

याबाबत परिसरातील निंबोल, अजंदा, विटवा व नांदूरखेडा येथील ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे तक्रार केली आहे. दरम्यान याची या विभागाने दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले असून याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अजंदा येथे बैठक घेण्यात आली.

या इंडस्ट्रीजने उद्योगातून निघणारे दुषित पाणी नाल्यात सोडले आहे. यामुळे या नाल्याच्या  काठावर असलेल्या रावेर नगरपालिका तसेच अजंदा, विटावा, नांदुरखेडा व निंबोल या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या कुपनलिकांचे पाणी दुषित झाल्याची तक्रार या ग्रामपंचायतींनी केली आहे. तसेच या परिसरातील सुमारे ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या कुपनलीकांचेही पाणी दुषित झाल्याने त्याचा परिणाम पिकांवर व शेतीवर होत आहे. याबाबत ५ एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केलेली आहे. याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही संबधित विभागाने या उद्योगावर आतापर्यंत कुठलीही कारवाई न केल्याने शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.

यासंदर्भात आमदार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन शेतकऱ्यांनी यावेळी आपली व्यथा मांडली. या बैठकीत मसाका उपाध्यक्ष भागवत पाटील, अजंदा सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच प्रवीण बिरपण, पांडुरंग पाटील, अनिल दत्तू पाटील, सुरेश पाटील, पंडित पाटील, संजीव पाटील, वासुदेव पाटील, हुकूमचंद पाटील, नांदूरखेडा येथील गजानन पाटील, देविदास पाटील, सुभाष महाजन, कैलास पाटील, निंबोलचे सतीश पाटील, अश्विन पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Protected Content