सावधान : दोन दिवसात वीज संकट; मोठे लोडशेडींग अटळ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्यामुळे मोठे वीज संकट कोसळणार असून आता लोडशेडींग अटळ असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अघोषीत लोडशेडींग सुरू असतांनाच आज खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबतची भयावहता जाहीर केली आहे. राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज जाहीर केले आहे. याहून भयंकर बाब म्हणजे जलउर्जा निर्मिती प्रकल्पात तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक असल्याने ही समस्या अजूनच चिघळणार आहे. केंद्राने कोळसा उपलब्ध करून नाही दिला तर मोठं वीजसंकट येणार असल्याचेही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये खंडीत विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांसह व्यवसाय, उद्योग आणि विशेष म्हणजे कृषी क्षेत्रावरही विपरीत परिणाम होत आहे. यातच आता खुद्द उर्जामंत्र्यांनीच याबाबत घोषणा केल्यामुळे राज्यात अभूतपुर्व वीज संकट निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

Protected Content