चोपडा लतीश जैन । ‘या वार्याच्या बसुनी विमान … सहल करूया गगनाची … चला मुलांनो आज पाहूया … शाळा चांदोबा गुरुजींची’ म्हणजेच ‘वार्याच्या विमानी बसून आकाशाच्या वर्गात भरणार्या चांदोबा गुरुजींच्या शाळेचे’ हे गीत आपल्या बालपणी ऐकले नसेल असा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात तरी विरळाच. पण आता चोपडा तालुक्यातील जि.प. प्राथमिक डिजिटल मॉडेल शाळा विरवाडे थेट मंगळ ग्रहावर भरणार आहे त्यासाठीचे शाळा, शिक्षकांसह विदयार्थांचेही बोर्डिंग पास आले आहेत.
मथळा आणि वरचा परिच्छेद वाचून बुचकळ्यात पडलात ना , तर त्याचे असे आहे की अमेरिकेच्या नासा या जगतविख्यात अवकाश संशोधन करणार्या संस्थेचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्षयान लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसर्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन दिली आहे . ही मोहीम नासाच्या वतीने चंद्रमोहिम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहिम अंतर्गत राबवत आहेत. नासाच्या पसाडेना , कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलेशन लॅबोरेटरीतल्या(गझङ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉक्निक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( ७५नॅनोमीटर ) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे सामावतात या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करुन मंगळावर पाठवल्या जातील. या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत सर्वांना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते. असे नासाच्या वॉशिंग्टन येथील सायन्स मिशनचे डायरेक्टरेट चे थॉमस झुरबुचेन म्हणाले. त्याअंतर्गत विरवाडे येथील जि.प. प्राथ. डिजिटल मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमासाठी नोंदवली होती. या अनुषंगाने ऑनलाईन आलेले बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश कोळी व उपाध्यक्ष प्रशांत माळके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशांत माळके यांनी शिक्षकांचे कौतुक करताना विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.आतापर्यंत जगभरातून ७४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे. एकट्या तुर्की या देशातून २४ लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे तर दुसर्या क्रमांकावर आपला देश असून भारतातूनही ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी नोंदवले आहे. रोव्हर २०२० हे यान अॅटलस ५४१ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० मध्ये लॉन्च केले जाणार आहे.जे २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे.
या संदर्भात नवोपक्रमशील शिक्षक नचिकेत पाटील म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यांना आपली नावे मंगळावर पाठवायची संधी उपलब्ध करुन दिली आहे तसेच आम्ही विद्यार्थ्यांना नासाच्या रोव्हरच्या काही चित्रफिती दाखवून त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक अकबर तडवी म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था , मंगळ ग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहिम आणि पाठवले जाणारे रोव्हर २०२० हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.