नवी दिल्ली- वृत्तसेवा । भारतीय क्रिकेटचा स्तंभ आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही बातमी धक्कादायक असली तरी गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा रंगत होतीच. टीम इंडियाचे माजी कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला आणि अवघ्या काही दिवसांत विराटनेही अशीच घोषणा केली आहे.
विराट कोहलीने आपल्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीबाबतची माहिती स्वतः सोशल मीडियावर शेअर केली. त्याने भावनिक भाषेत आपल्या प्रवासावर प्रकाश टाकताना लिहिले, “टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू परिधान केल्याला १४ वर्षे झाली. खरं सांगायचं तर, हा प्रवास मला कुठे घेऊन जाईल याची कल्पना नव्हती. या फॉर्मेटने मला तपासलं, घडवलं आणि आयुष्यभराच्या शिकवण्या दिल्या. पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. ही एक शांत लढाई असते, दिवस लांब असतात, आणि काही क्षण असे असतात जे कोणी पाहत नाही, पण ते कायम तुमच्यासोबत राहतात.”
भारतीय संघातला हा गुणी फलंदाज केवळ रन मशीन नव्हता तर संघाला प्रेरणा देणारा एक असामान्य खेळाडू होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक कसोटी सामने जिंकले. त्याच्या आक्रमक आणि समर्पित खेळशैलीमुळे विराटला टेस्ट क्रिकेटचा एक मानदंड मानलं जातं. त्याचे मैदानावरील तगडे परफॉर्मन्स आणि खेळावरील प्रेम चाहत्यांच्या मनात सदैव जागृत राहील.
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये विराटने भावनिक शब्दांत आपल्या चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “जेव्हा मी या फॉर्मेटपासून निरोप घेत आहे, तेव्हा हे सोपं नक्कीच नाही – पण योग्य वाटतंय. मी यात माझं सर्व काही दिलं आहे, आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक दिलं आहे. मी मनापासून आभारी आहे – या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, आणि प्रत्येकासाठी ज्यांनी मला या प्रवासात पाहिलं, समजून घेतलं आणि प्रोत्साहन दिलं. मी नेहमी माझ्या टेस्ट करिअरला स्मितहास्याने आठवेन.”
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समिती विराटला आगामी इंग्लंड दौऱ्यावर खेळवू इच्छित होती. मात्र रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही संन्यास ही भारतीय टेस्ट संघासाठी एक मोठी पोकळी निर्माण करणारी घटना ठरू शकते. विराटचा अनुभव, त्याचा संयम आणि तडफदार फलंदाजी टीम इंडियासाठी खूप मौल्यवान ठरली होती. विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील संन्यासाने भारतीय क्रिकेटमध्ये एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.