यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारूधंद्याविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला आहे. गावातील अवैध दारूविक्री तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा यावल पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा आणि व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांसह भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या संदर्भात समस्त ग्रामस्थांच्या वतीने यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मोहराळा गावातील विविध भागांमध्ये राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवैध दारूच्या विळख्यात युवक अडकत असून अनेक कुटुंबे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, दारूच्या व्यसनामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावातील सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात आली आहे. या गंभीर समस्येबाबत यापूर्वी अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गावातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या अवैध धंद्याला संरक्षण किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी गौरव सोनवणे (भीम आर्मी भारत एकता मिशन, यावल तालुका सचिव), सतीश अडकमोल (ऑल इंडिया पँथर सेना, तालुका अध्यक्ष), विनोद अडकमोल, गोविंदा सोनवणे, सचिन वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाने केवळ औपचारिक कारवाई न करता प्रत्यक्षात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली. दरम्यान, यावल तालुक्यात अनेक ठिकाणी मानवी जीवनासाठी घातक रसायनयुक्त अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवेदनानंतर केवळ प्रसिद्धीपुरती किंवा दिखाऊ कारवाई न करता ठोस आणि परिणामकारक कारवाई करावी, अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.



