Home प्रशासन निंबादेवी धरण शंभर टक्के भरले ; सांडव्याजवळील संरक्षक भिंत खचल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता,...

निंबादेवी धरण शंभर टक्के भरले ; सांडव्याजवळील संरक्षक भिंत खचल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता, प्रशासनाने धोका नसल्याचा दावा

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भोनक नदीच्या उगमस्थानी असलेले निंबादेवी धरण शंभर टक्के भरले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच धरणाच्या सांडव्याजवळील संरक्षक भिंत खचल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिप्रवाहामुळे सांडव्याच्या पायऱ्यांलगत असलेली भिंत कोसळल्याचे निदर्शनास आले असून भविष्यात यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या अतिप्रवाहामुळे सांडव्यालगतची भिंत खचल्याने धरणाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शाखा अभियंता वर्षा चव्हाण यांनी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. सांडव्याजवळील भिंत खचण्याचा प्रकार हा मागील वर्षीच घडलेला असून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होऊन आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निंबादेवी धरणाची पाणीसाठा क्षमता २.४२८ दलघमी असून सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. नायगाव, सावखेडासिम, दहिगाव, शिरसाळ, साकळी, नावरे आणि वडोदे या गावांतील शेतकऱ्यांसाठी हे धरण महत्त्वाचा जलस्रोत ठरत आहे.

याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी प्रशासनाकडे केली आहे. निंबादेवी धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नागादेवी पाझर तलावाकडे वळविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. असे झाल्यास नागादेवी पाझर तलाव दरवर्षी भरून राहील आणि दहिगाव, सावखेडासिम, मोहराळा यांसह परिसरातील अनेक गावांच्या शेतीला मोठा फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक नियोजन करावे, तसेच सांडव्याजवळील खचलेल्या संरक्षक भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. एकीकडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सिंचनासाठी दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound